Friday, September 30, 2011

जीवनाची कमाई

तंत्र आणि यंत्रं
गाड्या आणि विमानं
टीव्ही आणि कम्प्युटर
मोबाईल आणि इंटरनेट

माणूस म्हणतो
पहा आम्ही किती केली प्रगती

घरं आणि रस्ते
बागा आणि उद्यानं
टेकड्या आणि मैदानं
हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स
मल्टीप्लेक्स आणि मॉल्स
शाळा आणि मंदीरं
गुत्ते आणि स्मशानं
पाहावं तिथं माणसंच माणसं

जमीन सगळी माणसानी लाटली
वनसंपदा संपवून टाकली
वन्य पशु पक्षी लुप्त झाले
क्षुद्र जीव जंतू गुप्त झाले

हवेत धुराचं प्रदूषण
नद्यांत गटारींची घाण
शेतांत केमिकल्सचं थैमान
माणसानी सर्वत्र विष कालवलं
विषांनी त्याचंच शरीर पोखरलं
नवनव्या रोगांनी केलं हैराण

माणसाला स्मृतीभ्रंश झाला
आला कुठून जायचं कुठं विसरून गेला
नितीमुल्ये ढासळली
मन भोगात गुंतलं
चारित्र्य घसरलं

झाली एवढी गच्छंती
तरी माणूस म्हणतो
पहा आम्ही किती केली उन्नती

मोहनसुत प्रदीप म्हणतो
माणसा का करतोस दंभ येवढा
एके दिवशी मातीत मिळशील
बापाला वर तोंड काय दाखवशील

कर सत्कर्म काहीतरी
घे श्रीहरीचं नाव
तेवढीच जीवनाची कमाई
बाकी व्यर्थ उठाठेव

- प्रदीप अग्रवाल